वर्धा - देवळी येथे नगर परिषद आणि जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जुनी पाण्याची पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. शिवसेनेच्या अशोक काकडे यांनी हे काम आपल्या जागेतून असल्याने विरोध केला. यावेळी खासदार रामदास तडस हे उपस्थित असताना वाद झाला. हे प्रकरण पोलिसात पोहचले. यात दोघांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशोक काकडे हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. त्यांच्या सर्व्हे नंबर पाचमधून नगर परिषद आणि जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाला त्यांनी या पूर्वीही विरोध केला आहे. यामुळे रविवारी दुपारी हे काम सुरू असताना काकडे यांनी काम बंद पाडले. यावेळी खासदार तडस यांनी काकडे यांना गोटा मारला, जबरदस्तीने काम करत असल्याचा आरोप केला. तशी तक्रार त्यांनी देवळी पोलिसात केली.
हे काम पिण्याच्या पाईपलाईनसाठी आहे. नगर परिषद आणि जीवन प्राधिकरणाकडून जुनी पाईपलाईन काढून नवीन काम केले जात आहे. यावेळी काकडे हे काम करण्यास मनाई करत आहेत. या पाईपलाईनमुळे दोन हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. म्हणून मी यावेळी त्यांना समजवण्यासाठी गेलो. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत अपशब्द वापरला. यासह ही जागा शासनाची असून मिरणांनाथ महाराजांच्या मंदिराची होणारी यात्रा असून त्यासाठी राखीव आहे. यात काहींनी अतिक्रम केल्याचे सांगितले.
यात खासदार तडस आणि अशोक काकडे यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात पुढील तपासात ही जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे हे तपासले जाईल. यात जागेच्या मालकीचा प्रश्न सुटल्यानंतर तसेच नगर परिषद आणि जीवन प्राधिकरण यात काय पाऊले उचलतील हे सुद्धा म्हत्वाचे असणार आहे. पण, दुसरीकडे मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
यात घटना वर्ध्याच्या देवळीत घडली असली तरी पडसाद सर्वत्र उमटताना दिसून येत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने यावर निवडणुकीच्या काळात निवडून आलेले खासदार आता लोकांवर दगडफेक करत असून हे भाजपचे खरे रूप आहे, असे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप याला उत्तर देणार की, काय हे पाहावे लागणार आहे. शिवाय शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने ते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.