वर्धा - ट्रॅव्हल्सला कट लागल्याने दुचाकीचा गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. सावंगी बायपास वरून हे कुटुंब दुचाकीने जाताना सैनिकी धाब्यापासून काही अंतरावर हा अपघात झाला. या अपघात दुचाकीस्वाराची पत्नी आणि चार महिन्याच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार पती रुग्णालयात मृत्यूशी लढा देत आहे. आसाम रायफल बटालियनला असणारी शीतल भूषण सावध (25) असे महिलेचे तर अंशु (४ महिने) असे चिमुकलीचे नाव आहे.
वर्ध्यापासून काही अंतरावर असलेने मांडवा येथील हे दाम्पत्य कामानिमित्य वर्ध्यात आले होते. दुचाकीवर दाम्पत्य सायंकाळी सावंगीकडून बायपास मार्गाने मांडवा गावी जात होते. सैनिकी ढाब्यापासून काही अंतरावर असताना भरधाव असलेल्या नागपूर-यवतमाळ ट्रॅव्हल्सला रस्त्याच्या वळणावर दुचाकीची धडक बसली. यात दुचाकीस्वार हे दूरवर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापात झाल्याने शीतल सावध आणि अंशुचा मृत्यू झाला. तर भूषण सावध हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शीतल सावध ही आसाम रायफल बटालियनमध्ये कार्यरत होत्या. त्या प्रसूती रजेवर असताना मागील काही महिन्यांपूर्वी सासरी आल्या होत्या. चार महिन्याच्या चिमुकलीसह मातेचा मृत्यू झाल्याने अपघातस्थळी अनेकांचे डोळे पाणावले होते. या घटनेची महिती होताच घटनास्थळावर पोलीस पोहोचले. यावेळी जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रामनगरचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिली.
ट्रॅव्हल्स चालकाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मांडवा गावात शोककळा पसरली आहे.