वर्धा - चार महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन वर्ध्यातील एका आईने देशाचा नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे म्हणजे एक जबाबदारी आहे ही जबाबदारी शेख दाम्पत्याने पूर्ण केली. आपण तडजोड केली तर उद्याची पिढी सुद्धा तडजोड करेल. त्यामुळे ५ वर्षातून एकदा होणाऱ्या या उत्सवाला सहभागी होत देशाच्या नागरिकत्वाचा मिळालेला हक्क त्यांनी बजावून आई आणि नागरिक अशा दोन्ही भूमिका पार पाडल्या.
जिल्हा परिषद येथे चार महिन्याच्या चिमुकलीला घेऊन येत त्यांनी मतदान केले. आफ्रिन शेख असे या महिलेचे नाव असून शहाबाज असे मुलीच्या वडिलांचे नाव आहे. सहकुटुंब ४२ डिग्री तापमानात या दांपत्याने चिमुकलीसह मतदान करून देशासाठी असलेली आस्था मतदानातून व्यक्त केली.
आज जर आम्ही मतदानाचा हक्क न बजावता घरी बसलो तर या चिमुकलीला तोच आदर्श मिळू नये, म्हणून आम्ही मतदानासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच सर्वांनी मतदान हक्क बजावा असेही सांगितले.