वर्धा - पोलिसांच्या कामाचा ताण कमी करणारा मदतगार म्हणजे गृहरक्षक. पण नव्याने निघालेल्या आदेशाने गृहरक्षकांना नवीन काम शोधावे लागणार आहे. तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी जिल्हानिहाय गृहरक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात 400 गृहरक्षकांना कायमस्वरुपी बंदोबस्तातून कार्यमुक्त करण्यात आले. हाच आकडा महाराष्ट्राचा विचार केल्यास 15 ते 20 हजारपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन असो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होमगार्ड यांना खाकी वर्दीत उभे केले जाते. अपुरे पोलीस संख्याबळ पाहता सेवाधारी गृहरक्षक कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्ताला असतात. पण निधी अभावी 50 टक्के गृहरक्षकांना कायमस्वरुपी कमी करण्यात आले आहे. यामुळे पोलीस ठाण्याला मदतीसाठी दिसणारे गृहरक्षक पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात आले आहे. याचा ताण पोलीस प्रशासनावर वाढणार आहे.
मागील ३ महिन्यांपासून होमगार्ड यांना दिले जाणारे मानधन मिळालेले नाही. वर्ध्यात 3 कोटी रुपयांच्या घरात विविध बंदोबस्तातील मानधन रक्कम थकीत आहे. यामुळेच महाराष्ट्रभरात हाच आकडा आणखी मोठा असणार आहे. शिवाय हे पैसे न मिळाल्याने गृहरक्षकांसमोर आर्थिक अडचण असणार आहे.
राज्यात सुमारे 52 हजार गृहरक्षक संख्या आहे. यामध्ये 45 हजार गृहरक्षकांना ६ महिने रोटेशन पद्धतीने 180 दिवस काम दिले जाते. पण प्रत्यक्षात 120 दिवसांपेक्षा जास्त काम मिळत नाही. होमगार्डला एका दिवसाचे 670 रुपये मानधन मिळते. दिल्ली, मध्यप्रदेश आदी राज्यात होमगार्डंसना किमान ११ महिने रोजगार दिला जातो. मात्र, महाराष्ट्रात सगळे उलट होताना दिसत आहे.
होमगार्डंना स्थगितीच्या आदेशाने पोलिसांवरील कामाचा ताण वाढणारच आहे. हा ताण कमी करण्यासाठी पोलीस मदत बंदोबस्त लागला तर त्यासाठी महासमादेशक, अथवा उपमहासमादेशकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे होमगार्डंसना पुन्हा कायमस्वरुपी काम मिळावे, या मागणीला जोरदार झटका या आदेशाच्या निमित्याने बसणार आहे.
गृहरक्षकांना 175 रुपये मानधन मिळायचे. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना हा भत्ता वाढवण्यात आला. 1 एप्रिल 2014 पासून तो लागू झाला. 2019 मध्ये वाढून हे मानधन 570 रुपये करण्यात आले. यासह 10 तासापेक्षा जास्त काम केल्यास 100 रुपये उपहार भत्ता मिळवून 670 रुपये मानधन मिळत आहे. यात दोन महिन्यांच्या रोटेशन पद्धतीने सहा महिने काम करत असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र वर्षभरातील सण उत्सव, जयंती पुण्यातिथी हे धरून हा बंदोबस्त 100 ते 120 दिवसांपेक्षा जास्त जात नसल्याचे म्हटले जाते. होमगार्ड विकास समितीच्या वतीने वर्षभर काम देऊन मानधन मिळावे अशी मागणी केली जात आहे. पण प्रत्यक्षात यावर तोडगा निघत नाही.