वर्धा - तोतया पोलीस भासवून अल्पवयीन शाळकरी मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. राजेश येरपुडे (वय ४२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो प्रतापनगर येथील रहिवासी आहे. तर दुसरीकडे अशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेत चक्क पोलिसांचीच फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा - दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळांची वापसी; 'महाविकासआघाडी'चे संख्याबळ 163
प्रतापनगर येथील उद्यानामध्ये शाळकरी मुलांचा घोळका बसला असता याच परिसरात राहणारा राजेश येरपुडे याने अंधाराचा फायदा घेत मुलांना धमकावत पोलीस असल्याची बतावणी केली. यातील एका मुलाला आणि मुलीला त्याने थांबवले. आई-वडिलांना बोलावतो आणि पोलिसात नेतो, असे धमकावले. घाबरलेल्या अवस्थेत मुलाला जाण्यास सांगितले. तसाच धाक मुलीला दाखवत शहराबाहेर आर्वी मार्गावरील एका अज्ञातस्थळी नेऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग करत त्याच उद्यानाजवळ आणून सोडले.
हेही वाचा - सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका; शरद पवारांचा नवनिर्वाचीत सदस्यांना धीर
अल्पवयीन पीडितेने घडलेला प्रसंग घरच्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी रामनगर पोलिसात तक्रार केली. आरोपी राजेश येरपुडेला राहत्या घरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी एका खासगी औषध कंपनीत मेडिकल प्रतिनिधी म्हणून काम करत होता. मात्र, घडलेल्या प्रकाराची माहिती नागरिकांना कळताच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एडीपीओ पियुष जगताप हे करत आहेत. तसेच रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक, तसेच महिला पीएसआय यात अधिक पुरावे गोळा करत पुढील तपास करत आहेत.