वर्धा - विरोधी पक्षातील शेतकरी पॅकेजविषयी आंदोलन करून चुकीचा प्रचार करीत आहेत. विरोधकांचा हा बुद्धिभेद आहे. 'शेतकरी पॅकेज' हे कोण्या एका विभागासाठी नाही, तर ते सरसकट संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. जाहीर झालेले पॅकेज हे कोण्या एका भागासाठी किंवा कोण्या एका जिल्ह्यासाठी नाही. त्यामुळे विरोधक हे चुकीचा प्रचार करत असल्याची टीका वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी वर्ध्यात केली. वर्ध्याच्या दौऱ्यावर असतांना ते पत्रकारांशी बोलत होते.
ज्या भागातून अतिवृष्टीचे अहवाल गेले, जिल्हाधिकारी यांच्याकडून नुकसान भरपाई झाल्याचे अहवाल गेले आहे, त्या जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना पॅकेजचा लाभ मिळणार असल्याचे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या दिशाभूल करण्याच्या आंदोलनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या त्रासासाठी कुंपणव्यवस्था जलसंधारण, कुरण व्यवस्था अशा अनेक चांगल्या योजना वन विभागाच्या माध्यमातून राबवल्या जात असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.
ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विश्रामगृहात थांबले असता यावेळी शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख प्रशांत शहागाडकर, अनिल देवतारे, रवींद्र बालपांडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - उगाच नाही डॉक्टरांना दैवत मानतात, कोरोनात जीवनदान देणाऱ्या नवदुर्गा