वर्धा - लॉकडाऊन झाल्यापासून नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. यात बाहेर राज्यातून आलेला मजूरवर्ग हा बेरोजगार झाला. यावेळी काही मजूर काही ठिकाणी थांबले तर काहींनी पायपीट करत घरी जाण्याच्या मार्ग निवडला. आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असताना वर्ध्याच्या रिंगरोडवर मजूर उपाशी चालत जाताना दिसले. यावेळी त्यांना खाण्या-पिण्याचे साहित्य देऊन एका वाहनाच्या मदतीने पुढील पायपीट थोडी का होईना कमी करून देण्यास हातभार लागला.
वर्धा रिंगरोडवर मजुरांचे जत्थे, गावी जाण्यासाठी भर उन्हात पायपीट वर्ध्याच्या रिंगरोडवर नागपूरच्या दिशेने निघालेला हा श्रमिकांचा जत्त्था. वरती सूर्य तळपत आहे. सिमेंटच्या रस्त्याचे चटके सहन करत चालत आहेत. हाताला काम नाही, पदरचे पैसेही संपल्याने कशाला थांबायचे, काय करायचे, अशा प्रश्नांचे उत्तर म्हणून जीवघेणी पायपीट करत हे मजुर पुढे जात आहेत.वर्धा रिंगरोडवर मजुरांचे जत्थे, गावी जाण्यासाठी भर उन्हात पायपीट एकदा खायला मिळाले नाही तर चालेल पण, आम्हाला गावात पोहचायचे आहे. हेच ध्येय मनात ठेवून आम्हाला काहीच नको, आम्हाला आता आमच्या गावी जावू द्या. हे वाक्य जेव्हा घरी जाणाऱ्या आसुसलेल्या तोंडातून बाहेर पडते तेव्हा मात्र काळजाचा थरकाप उडतो. इतक्या कडक उन्हात डोक्यावर वाटेल ते बांधून हे मजूर गावी निघाले आहेत. घराची ओढ असल्याने ना त्यांना उन्हाची तमा आहे ना जेवणाची.
वर्धा रिंगरोडवर मजुरांचे जत्थे, गावी जाण्यासाठी भर उन्हात पायपीट एखादे वाहन थांबले तर तेवढा दिलासा त्यांना मिळतोय. मग आहे तेवढे ट्रकमध्ये बसतात. यात ना सोशल डिस्टनसिंग ना काही. डोळ्यापुढे असलेली गावची ओढ हेच काय त्यांना चालण्यासाठी बळ देते. वर्धा रिंगरोडवर मजुरांचे जत्थे, गावी जाण्यासाठी भर उन्हात पायपीट घराची ओढ किती ताकदवर ठरू शकेल हे कोरोनाच्या संकटात पाहायला मिळाले. कामासाठी झटणारे हात हजारो किलोमीटर अंतर कापून आले. पण, कामच बंद झाल्याने आता तेच हात डोक्यावर बिराड घेऊन घरी परतण्यासाठी धडपडू लागले आहे. मजबुरीने आलेला हा मजुरवर्ग आता मात्र घरी जाण्यासाठी जीव की प्राण पणाला लावताना दिसतो आहे. यामुळे हे सगळे आत्ता सुखरूप घरी पोहचतील एवढीच आशा करूयात.