वर्धा - आर्वी तालुक्यातील बोरी येथे समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांच्या बेस कॅम्पला वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसला आहे. यामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाच्या कामावर याचा परिणाम पडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
समृद्धी महामार्गाचे वेगवेगळ्या फेजमध्ये काम सुरू आहे. यात वर्धा जिल्ह्यातील अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी हे काम पाहत आहे. मोठे काम असल्यामुळे इंजिनिअरपासून लेबरपर्यंत मोठ्या फौजफाट्यासह यंत्रसामग्री आहे. रस्ता बांधकामाच्या भाग म्हणून ठीक-ठिकाणी बेस कॅम्प तयार करण्यात आले आहेत. यातील आर्वी तालुक्यातील बोरीबार शिवाराच्या टेकडी परिसरातील बेस कॅम्प वादळी वाऱ्याने उनमळून टाकला आहे.
कशाचे झाले नुकसान?
या बेस कॅम्पमध्ये टिनाच्या साह्याने तयार करण्यात आलेले घर तसेच घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. प्रशासकीय कामासाठी वातानुकूलित ऑफिस, कर्मचाऱ्यांचे घर, साहित्य ठेवण्यासाठी असलेले लोखंडी शेड, मोठया प्रमाणात असणारी वाहने यासाठी तयार करण्यात आलेले पेट्रोल पंप मशीन, याचे मोठ्या प्रमाणात या वादळात नुकसान झाले आहे. कामावर असलेली क्रेनसुध्दा वादळाचा सामना न करू शकल्याने जमिनीवर आडवी झाली आहे. हे नुकसान लाखोंच्या घरात असून महत्वाचे कागदपत्र सुद्धा खराब झाल्याचे सांगितले जात आहे.