वर्धा - यंदाचे वर्ष हे भूदान प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचे 125 वे जयंती वर्ष आहे. यामुळे यंदा पुण्यतिथी साजरी होत असताना त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मैत्री मिलन या कार्यक्रमाला आज देशभरातील 13 पेक्षा जास्त राज्यातून आलेल्या लोकांनी हजेरी लावली. यात सकाळपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. पहाटे समाधी दर्शन, जय जगात प्रार्थना, स्तुति भजन, श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हेही वाचा- पालघरमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रॅगिंगप्रकणी १५ वरिष्ठ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
सकाळच्या प्रथम सत्रात ज्येष्ठ गांधी, विनोबा विचाराक बाल विजय यांनी विचार मांडतांना 'गांधीयन नका बनू, तर गांधीजन बना,' असे मत व्यक्त केले. गांधीजन बनणाऱ्यांची वृत्ती अध्यात्मिक असली पाहिजे, पूजा पाठ करणे म्हणजे अध्यात्म नाही. तर आपल्याला जसे सुख होते, दुःख होते तसेच इतरांना पण होत असते, असे ते म्हणाले. वृत्ती अध्यात्मिक असायला पाहिजे पण दृष्टी वैज्ञानिक असली पाहिजे. यामुळे चिंतन जे होईल ते एकांगी नसेल तर समन्वयात्मक चिंतन होईल. प्रवृत्ती करुणामयी होवो, असे बाल विजयजी प्रथम सत्रात म्हणाले.
यावेळी विनोबा विचारक रमेशभाई ओझा यांनीही विचार मांडताना त्यांनी विनोबा म्हणजे बाबांनी दिलेली शिकवण घेऊन काम केले पाहिजे. जनशक्ती सर्वात ताकदवर शक्ती आहे. शासनशक्ती सर्वात लहान शक्ती आहे. जनशक्ती जागी झाली तर इतर शक्तीची गरज पडणार नाही. विनोबांनी सांगितलेल्या विचारावर आपण चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेले कार्य केले पाहिजे. लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, विधवा भगिनींसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी, बेरोजगार यांच्यासाठी काम करा. मात्र, आपण पाहण्याच्या भुमिकेत असतो, काम मात्र सरकार करते. त्यामुळे आपण कामासाठी पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले.
पवनार धामचे प्रकाशक पराग चोलकर यांनी विनोबांचे साहित्य हे इंग्रजी सारख्या भाषेत अनुवाद होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर करुणाताई फुटाणे यांनी सूतकताई श्रम वाढवायचे श्रेय हे विनोबांचे आहे, असे सांगितले. विनोबा भावेंनी स्वतः सूतकताई करुन केलेले श्रम अनुभवले आहे. ते केवळ बोलत नव्हते तर ते सिद्ध करुन दाखवत होते, असेही त्यांनी सांगितले.
आज देशभरातून विविध राज्यातून आलेल्या गांधी, विनोबांच्या विचारांची शिकवण घेण्याचे काम या मैत्री मिलन सोहळ्यातून केले. यात मान्यवरांनी विनोबा यांचे जीवन त्यांचे विचार आणि आजही त्यांच्या विचारांची असलेली ताकदीची ओळख आणि गरज व्यक्त केली. या विचाराचे अवलंब करत कशा प्रकारे आयुष्य जगता येऊ शकते हा संदेश दिला.