वर्धा - महात्मा गांधी यांच्या पावन स्पर्शाने वर्धा जिल्हा पुनीत झाल्याने एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच सेवाग्राम आश्रमात बापू दहा वर्ष वास्तव्यास राहीले. याच सेवाग्राम आश्रमातील मार्गदर्शिका म्हणून कार्यरत असलेल्या महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सोबतच इथे येणाऱ्या पर्यटकांनीसुद्धा मतदान करून भेटी दिल्या.
रोज सेवाग्राम आश्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. आज सुट्टीचा दिवस असूनही मतदानाचा दिवस असल्यामुळे इथे गर्दी कमी असल्याचे चित्र दिसून आले. अनेकांनी सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदान करून ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. तर या पर्यटकांमध्ये भेट देणारे बाहेर जिल्ह्यातीलसुद्धा लोक असल्याचे दिसून आले होते. मतदान नसणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनीसुद्धा सेवाग्राम आश्रमाला भेट दिली.
सेवाग्राम आश्रमात भेट देणाऱ्यांना मार्गदर्शिका संगीता चव्हाण, प्रभाताई शहाणे, सुनिता परचाके, यांनी मतदान केले. आज आश्रमाला भेटी देणाऱ्यांचा ओघ कमी होता. इथे रोज ४०० ते ५०० लोक भेट देतात. आज मात्र हा आकडा १०० च्या जवळपास असल्याचे सांगतात. याचाच अर्थ मतदारांनी पर्यटनस्थळी न जाता मतदान करण्यावर भर दिला.