वर्धा- वर्ध्यात महात्मा गांधींचा १५१ वा जयंती सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सायकल रॅली काढून या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीतून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उपक्रमाबाबत देखील जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागातून लोकप्रतिनिधींच्या हस्ते सायकल यात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. सायकल यात्रेने जनजगृती करत कोरोनामुक्तीकडे पाऊल टाकत खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानाच्या माध्यमातून कोरोनामुक्तीसाठी काळजी घेण्याचे नियम सांगितले जात आहे. लस येईपर्यंत हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर ठेवणे, हे नियम पाळणे गरजेचे आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी प्रत्येक सायकल चालकाने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे वाक्य लिहिलेले टीशर्ट घालून शहरातील विविध भागातून भ्रमंती केली होती.
सेवाग्राम आश्रमपासून सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. यावेळी सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टीआरएन प्रभू यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. बजाज चौकातून खासदार रामदास तडस, गांधी चौकातून आमदार रणजित कांबळे आणि आर्वी नाका येथे आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती मोहिमेला सुरवात करण्यात आली.
यासह आर्वी येथे आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या हस्ते सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. कारंजा येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांच्या हस्ते सुरवात झाली. तसेच, हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. तसेच, काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते रॅलीला मार्गस्थ करण्यात आले.
गांधी चौक येथे जिल्हाधिकारी विवेक भिमानवार, नगराध्यक्ष अतुल तराळे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डवले यांच्या उपस्थितीत रॅलीचा समारोप झाला. यावेळी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या माहिती पत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून वितरण करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांनी खबरदारी घेतल्यास कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
सायकल रॅलीमध्ये डॉक्टर सचिन कवडे, मंगेश दिवटे, संजय दुरकर, वैद्यकीय जनजागृती मंच, बहार नेचर ग्रुप, वर्धा सिटी सायकल ग्रुप, रायडर ग्रुप, तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः सायकल चालवत जनजागृती अभियानात सहभाग घेतला.
हेही वाचा- आष्टी तहसीलदारांच्या दालनाला आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !