वर्धा - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे छोटे व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. व्यवसाय छोटा असतानाही त्यांनी महाराष्ट्र सरकराला लॉकडाऊनच्या काळात सहकार्य केले. मात्र, आता त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारने ज्या पद्धतीने छोट्या व्यवसायीकांना मदत जाहीर केली. त्याच प्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही मदत जाहीर करावी, यासंबधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
सलून मालक, बँड पथक, शिवणकाम, ऑटो रिक्षा चालक, आदी आपल्या कामातून मिळणाऱ्या पैशांवर आपल्या प्रपंचाचा गाडा चालवतात. कोरोनामुळे सलून व्यवसायिकांना अजून दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली नाही. तसेच ऑटोरिक्षा चालक यांना प्रवाशी मिळत नसल्याने व्यवसाय ठप्प आहे. गेल्या तीन महिन्यात घरातील जमा पुंजीही संपली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांचे शिक्षण, वीज बिल, यासारखे अनेक खर्च समोर आहेत. यामुळे या छोट्या व्यवसायीकांना मदत करण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
छोट्या व्यवसायिकांच्या अडचणीसंबधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, यांना पत्र पाठवले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीचा पाठपुरावा करावा, अशी विनंती रामदास तडस यांनी केली. छोट्या व्यवसायिकांना कर्नाटक सरकारने ज्या पद्धतीने आर्थिक अडचणीत मदतीचा हात दिला. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने छोटे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी खासदार तडस यांनी केली आहे.