नागपूर : व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून उनाड इच्छा विरुद्ध समाजहीत असा दारूचा प्रश्न आहे. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी दोन लाख कोटींची दारू फस्त केली जाते. महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झाले आहे. दारूमुळे भारतीय स्त्री वैधव्याची इच्छा करत आहे. मात्र, राजकारण आणि निवडणुका दारुवर विसंबून असल्याने मद्य प्रश्नांच्या समस्येला बगल देण्यासाठीच दारूबंदीचा बागुलबुवा होत आहे. असा आरोप गडचिरोली येथील शोधग्रामचे पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केला आहे. दारूमुळे कित्येक वर्ष समाजहित धोक्यात आले आहे. मात्र, दारूला शिक्षा कधी होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत असल्याची भावना बंग यांनी व्यक्त केली.
मराठी साहित्यिक अपयशी ठरले : सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास उलगडताना डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांवरही काही आक्षेप घेतले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यावर विशेष असा प्रकाश मराठी साहित्यिकांकडून टाकण्यात आलेला नाही. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात विविध विचारक, वेगवेगळे सेनापती इथे घडले. मात्र, या महाभारताचा वेध घेण्यात मराठी साहित्यिक अपयशी ठरले. हा इतका मोठा रंजक काळ ललित आणि बुद्धीनिष्ठतेने आता तरी साकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाष्ट्रातील ज्ञानोबा, तुकोबा, विनोबा हे सर्वकालिक महान साहित्यिक घडले. साहित्यिकांसाठी आळंदी, देहू आणि वर्धा साहित्य पंढरी व्हावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आजची शिक्षण पद्धती म्हणजे शोकांतीका : आजच्या शिक्षण पद्धती इतकी मोठी शोकांतीका नाही. शेती नंतरची सगळ्यात मोठी इंडस्ट्री शिक्षणाची आहे. एका अर्थाने आजची शिक्षण पद्धती म्हणजे रोजगार हमी योजना असून मुलांचा रेसकोर्स झाला आहे अशी, बंग यांनी केली. संमेलनात शनिवारी मुक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाट, विवेक सावंत, बंग यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी बंग यांनी रोखठोक भूमिका मांडली. सुमारे १५ ते २० कोटी लोकांना रोजगार देणारी ही इंडस्ट्री आहे. आजची शिक्षण व्यवस्था मुलांचे खच्चीकरण करून त्यांना बैल म्हणून कामाला जुंपण्याचे काम करते. निर्जीव शिक्षण आणि निर्बुद्ध जगणे असे विनोबा म्हणायचे. अगदी तसेच शिक्षण आता मिळत आहे. यातून बाहेर यायचे असेल तर विनोबा म्हणत त्याप्रमाणे जीवन हेच शिक्षण या सूत्राने शिक्षण घेतले पाहिजे, असे डाॅ. बंग यांनी सांगितले.
तेराव्या वर्षी मिळाले जीवनाचे ध्येय : माझा मोठा भाऊ अशोक १६ आणि मी १३ वर्षांचा होतो. त्यावेळी अशोकने आता आपण मोठे झाल्यामुळे एक ध्येय निश्चित करून काम केले पाहिजे असे सांगितले. अशोकने शेती सुधारणेत काम करायचे ठरवल्यानंतर माझ्यासाठी आरोग्य क्षेत्र राहिले. वयाच्या १३ व्या वर्षीच जीवनाचे ध्येय मिळाले असे बंग यांनी सांगितले.