वर्धा - मागील अनेक दिवसांपासून रखडलेला वर्ध्यातील काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला. अखिल भारतीय काँग्रेसच्या आज जाहीर झालेल्या यादीत चारुलता टोकस यांना उमेदवारी जाहीर झाली. मागील काही दिवसांपासून स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने या जागेची मागणी केली जात होती. शरद पवार यांनीही स्वाभिमानीसाठी आग्रह धरला होता. अखेर आज तिढा सुटला आणि काँग्रेसने ही जागा स्वतःकडे ठेवली.
वर्धा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. स्वातंत्रपूर्व काळात सेवाग्राम इथून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या जागेला काँग्रेससाठी वेगळं महत्व आहे.
चारुलता टोकस
चारुलात टोकस या दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या आहेत. काँग्रेसच्या काळात प्रभा राव या वजनदार नेत्या होत्या. चारुलता टोकस सध्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचे गांधी कुटुंबियांशी घनिष्ट संबंध आहेत. तसेच देवळी मतदारसंघात प्रभा राव यांचे मानसपुत्र रणजित कांबळे हे आमदार आहेत. हीदेखील टोकस यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
सुबोध मोहितेंची सदिच्छा भेट
शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुबोध मोहिते पाटील यांनी चारुलता टोकस यांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. या भेटीनंतर घोषणा झाली नसली तरी चारुलता टोकस यांना उमेदवारी मिळणार हे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले होते. आज अधिकृत घोषणेनंतर टोकस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काँग्रेस वर्ध्यात ११ वेळा विजयी
१९५१ मध्ये श्रीमन्नारायण अग्रवाल हे पहिले खासदार वर्ध्यातून विजयी झाले. त्यांनतर तब्बल ९ लोकसभा निवडणुकीत इथून काँग्रेसला विजय मिळाला. यामध्ये कमलनयन बजाज हे १९५७ ते १९६७ दरम्यान तीन वेळा विजयी झाले. त्यांनतर जगजीवन कदम, संतोषराव गोडे, वसंतराव साठे हे सुद्धा तीनदा निवडून आले. त्यांनतर सध्या भाजपत असलेले दत्ता मेघे काँग्रेसमध्ये असताना १९९८ आणि २००९ मध्ये निवडून आले आहेत. असा एकूण ११ वेळा काँग्रेसचा इथून विजय झाला.
भाजप वर्ध्यातून ३ वेळा विजयी, एकदा माकपचाही खासदार
भाजपचे पहिले खासदार म्हणून विजय मुडे हे १९९६ मध्ये विजयी झाले. त्यानंतर २००४ मध्ये सुरेश वाघमारे आणि २०१४ मध्ये रामदास तडस विजयी झालेत. माकपचे रामचंद्र घंगारे हे १९९१ मध्ये खासदार म्हणून निवडणून आले होते.
यंदाची लढत भाजपचे रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यात होणार आहे. यामुळे वर्ध्यातील राजकारण आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापायला लागले आहे. विद्यमान खासदार तडस हे शुक्रवारी २२ तारखेला नामांकन अर्ज भरणार आहेत.