वर्धा - हिंगणघाट पोलिसांनी केलेल्या कारवाईत दारू वाहून नेणाऱ्यांची नवीनच शक्कल उघडकीस आली. एका मालवाहू जीपमध्ये चक्क कांद्याच्या आड दारू वाहून नेली जात होती. हिंगणघाट-चंद्रपूर मार्गावर नंदोरी चौकात या जीपवर करवाई करण्यात आली. यात पोलिसांनी जवळपास १२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक केली आहे.
हिंगणघाट पोलिसांच्या डीबी पथकाला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. ट्रक (क्र. एमएच १० सीए ६१४९)मध्ये १५ कट्टे कांद्यांच्या आड १२० पेट्यांमध्ये देशी दारूच्या १ हजार २०० बाटला, ३०० किलो कांदे, मालवाहू जीप व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मूर्तिजापूर येथून चंद्रपूरकडे दारूची वाहतूक होत होती. कारवाईत मंगेश मदन अहेरवाल (वय २३) बाबूलाल सिद्धार्थ सदाशिवन (वय ३०) (दोघेही रा. मूर्तिजापूर, अकोला) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, डीबी पथकाचे जमादार शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे आदींनी केली आहे.
हेही वाचा- देवी विसर्जनादरम्यान तलावात पडल्याने एकाचा मृत्यू