वर्धा - शुक्रवारी शेवटच्या दिवशी आघाडी आणि युतीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात बंडखोरी करणाऱ्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. हिंगणघाट मतदारसंघात युतीसह आघाडीतही बंडखोरी झाली आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन राष्ट्रवादीच्या एक, सेनेच्या एक आणि बसपा, वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष मिळून असे एकूण 58 उनेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
देवळी मतदा संघातून सलग चार वेळा निवडणुन आलेले काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दिवंगत प्रभा राव यांचा वारसा सांभाळत पाचव्यानंदा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. 2014च्या मोदी लाटेतही काँग्रेसचा त्यांनी ही जागा जिंकली होती.
हेही वाचा - 'आता बारा वाजणार'; प्रकाश मेहतांचा इशारा
यंदा देवळी मतदारसंघ जागा वाटपात सेनेच्या वाट्याला गेला आहे. राष्ट्रवादीला रामराम करत सेनेची उमेदवारी मिळालेले समीर देशमुख यांनी महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. समीर देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी पदाचा राजीनामा देत बंडखोरी केली आहे.
हेही वाचा - राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?
आर्वी मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार अमर काळे यांनीही आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. 2004 पासून भाजपचे दादाराव केचे आणि अमर काळे हे एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहे. यंदा चौथ्यांदा दोघेही निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.
हिंगणघाट मतदार संघातून आघाडीचे उमेदवार राजू तिमांडे यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवत उमेदवारी अर्ज भरला असला तरी आता पर्यंत त्यांच्या पाठिशी राहिलेले सहकार क्षेत्रांतील नेते सुधीर कोठारी यांनी त्यांचा विरोधात बंडखोरी केली आहे. अपक्ष उमेदवारी भरत त्यांनी राष्ट्रवादीला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. तर शिवसेनेचे अशोक शिंदे यांनीही भाजपच्या विरोधात बंडखोरीचे हत्यार उपसले आहे.
यांच्यासह जिल्ह्यातील चारही मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करणयात आले. यात सर्वाधिक 18 उमेदवारी अर्ज हे हिंगणघाट मतदारसंघातून भरण्यात आले. देवळीतून 15 अर्ज तर वर्ध्यात 13 नामांकन अर्ज भरण्यात आले असून आर्वीत 12 उमेदवारी अर्ज भरण्यात आले. एकूण 58 उमेदवारांचे अर्ज आले असून छाननी नंतर उमेदवारी माघारी घेणाऱ्यांच्या संख्येनंतर किती उमेदवार रिंगणात असणार आहे हे स्पष्ट होईल.