वर्धा - सेलू तालुक्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसासह वादळाने मोठे नुकसान झाले आहे. टाकळी 12 घरांचे छप्पर उडाले आहे, तर अनेकांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत. त्यामुळे भर पावसात अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
सेलू तालुक्यात एका ठिकाणी भिंती खाली दबून एका गाईचा मृत्यू झाला आहे. नुकसान झालेल्या सर्व घरांचे तलाठ्याने त्वरीत पंचनामे करुन कार्यतत्परता दाखवली आहे. आठवड्याच्या सुरूवातीला सोमवारपासूनच वादळी पावसाला सुरवात झाली. २ दिवस पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. २ दिवसांच्या विश्रांतीनंतर झडशी परिसरात अचानक वादळासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी आलेल्या वादळाने टाकळी (झ) या गावाला फटका दिला.
यामध्ये मारोती गेडाम यांचे घराचे छप्पर उडाले. त्यांच्या घराची भिंत पडल्याने त्याखाली दबून गाय मरण पावली. शामु शिवरकर, नारायण सावरकर, ज्ञानेश्वर पारटकर, प्रेमीला पाटील, भानुदास नगराळे, शेखर तेलरांधे, बालाजी दूधकोर, संजय डवरे अशी घरावरील छप्पर उडून नुकसान झालेल्यांची नावे आहेत. या वादळात झाडांसह विद्युत खांबही जमीनदोस्त झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच झडशीचे तलाठी सुदेश जाधव आणि सहाय्यक नितीन भांडेकर यांनी तत्काळ टाकळी गावाला भेट देत नुकसानीचा अहवाल तयार केला. लवकरच नुकसान भरपाई मिळले अशी गावकऱ्यांना आशा आहे.