वर्धा - जिल्ह्यात मंगळवारी एक लग्न सोहळा पार पडला. ज्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीतील गावांसह विदर्भात सुरू आहे. कारण हा विवाह सोहळा होता ईटीव्ही भारतचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी पराग कृष्णराव ढोबळे यांचा. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत अवघ्या 20 वऱ्हाडींच्या हा विवाह सोहळा पार पडला.
लग्नावर होणाऱ्या वारेमाप खर्चाला फाटा देत पराग आणि विशाखाचा लग्न सोहळा निसर्गाच्या हिरव्या कंच मंडपात संपन्न झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नववधु विशाखा ही परागची बाल मैत्रीण आहे, आज या मैत्रीचे गोड नात्यात रूपांतर झाले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात एक सजग पत्रकार म्हणून कर्तव्यपुर्ती करणारे पराग हे मुळचे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे राहणारे. तर विशाखा ही कारंजा तालुक्याच्या दानापूरातील दिलीप धोपटे यांची कन्या. पराग आणि विशाखा हे दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत.
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला परागचा साखरपुडा झाला. तेव्हाच 5 मे रोजी लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे लग्न पुढे ढकलावे लागेल असे वाटत असताना परागने शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून ठरल्या दिवशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न सोहळ्याला दूर जिल्ह्यात राहणारे नातलग आणि मित्र येऊ शकणार नाही, याची खंत तर होतीच. मात्र, काळाची गरज ओळखत पराग आणि विशाखाने एक मत करून हा आदर्श विवाह सोहळा घडवून आणला आहे.
कोरोनाची धास्ती असल्याने लग्नाला आलेल्या सर्वांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. विवाह सोहळा आटोपल्यानंतर पराग यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. परागने सांगितले, ज्यावेळी विशाखा आणि मी लहान होतो, त्यावेळी आमच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर सलग सात वर्ष आमच्यात अबोला होता. मात्र, शिक्षणाच्या निमित्ताने जेव्हा विशाखा आर्वी येथे आली, तेव्हा आमच्यात पुन्हा मैत्री झाली. त्या घट्ट मैत्रीचे नात्यात रूपांतर होत आहे, याचा विशेष आनंद वाटत असल्याचे परागने सांगितले. या विवाह सोहळ्याला अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हजेरी लावली.