वर्धा - शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच मृत्यूदरातही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापाऱ्यांनी चार दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावरून दोन गट पडल्याने या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी वाढती कोरोना संख्या पाहून हा बंदचा निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेसच्या गटाने याला विरोध केला आहे. .
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच काही व्यावसायिकांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातूनही भीतीचे निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात चार दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला. याला व्यापारी वर्गाने व भाजपने पाठिंबा दिला. मात्र, छोट्या व्यावसायिकांची बाजू घेत काँग्रेसने यास विरोध दर्शवला. मात्र, अशा राजकीय विरोधाताच शुक्रवारी हा कर्फ्यू पाळण्यात आला याला संंमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुकारण्यात आलेल्या या कर्फ्यूला 21 संघटनानी सहमती दर्शवत दुकाने बंद ठेवली. मात्र, हा प्रशासनाने जाहीर केलेला कर्फ्यू नसल्याने नागरिकांना दुकाने उघडणे किंवा बंद ठेवणे हे बंधनकारक नव्हते, त्यामुळे ज्यांचा या कर्फ्यूला विरोध होता त्यांनी दुकाने उघडी ठेवल्याचा प्रकार पाहायला मिळाला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याला राजकीय वळण लागल्याने पुढील तीन दिवस हा कर्फ्यू योग्य रित्या पाळळा जातो की, असाच संमिश्र प्रतिसाद राहतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वर्धासह कुठले पळला कर्फ्यू?
या जनता कर्फ्यूला वर्धेकरांसह पुलगाव आणि समुद्रपुरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात पुलगाव आणि समुद्रपूरात कुठलाच राजकीय वादंग न झाल्याने खऱ्या अर्थाने जनता कर्फ्यु ठरला.