वर्धा - समुद्रपूर तालुक्याच्या सावंगी (झाडे) येथे काल घरातून दुर्गंधी सुटल्याने माय लेकीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. घरात आई आणि मुलगी दोघीच राहत होते. घरातून कोणीच बाहेर आले नसल्याने दार तोडून आत गेले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यात मृत्यूचे कारण कळू शकले नाही. सुभद्रा डोमाजी मांडवकर (वय 80), सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे (वय ४५) अशी मृतकांची नाव आहेत.
हेही वाचा - 'वर्ध्यातील जम्बो कोविड रुग्णालयाचा प्रस्ताव कॅबिनेटपुढे'
दोघींचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसून आले
दोघी माय लेकी या कुटुंबीयांपासून वेगळ्या राहत असत. मुलगी सुरेखा ही आजारी होती. काही दिवसांपूर्वीच हिंगणघाटच्या रुग्णालयातून ती तिच्या आईच्या घरी परतली होती. काल सकाळी मृत महिलेची सून जिजाबाई प्रकाश मांडवकर हिला दुर्गंध आली असता तिने महिलेच्या घरी जाऊन पाहिले. येथे दोघींचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले.
शेतमजुरी करून उदरनिर्वाह
याबाबत कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी उपसरपंच अजय कुडे व पोलीस पाटील समीर धोटे यांना माहिती दिली, तसेच तत्काळ समुद्रपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. सदर महिला शेतमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती. मुलगी सुरेखा मागील 7 वर्षांपासून आजारी होती. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळू शकले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृतदेह पीपीई किट घालून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर कारवाई करत मृतदेहांचा अंत्यसंस्कार करण्यात आला असल्याची माहिती पुढे येत आहे. पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी धनंजय पांडे आणि अमोल पुरी हे करत आहेत.
हेही वाचा - मुंबईत चाचण्या वाढवले पाहिजे - देवेंद्र फडणवीस