वर्धा - वर्ध्यात आज युवक काँग्रेसच्या वतीने हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसने राष्ट्रीय महामार्ग सहावरील टी-पॉईंटवर रस्तारोको आंदोलन केले.
तसेच, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पीडित कुटुंबीयांच्या भेटीला जात होते. या दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्याशी धक्काबुक्की केली. या घटनेमुळे देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेत. त्यांच्याकडून ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय महामार्ग सहावरील तळेगाव टी पॉईंटवर काँग्रेस कार्यकर्ते एकवटले व त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवले. त्यामुळे, रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.
याबाबत तळेगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलन संपुष्टात आणले. पोलिसांनी युवक काँग्रेस आणि काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी मार्गावरील टायर हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला.
हेही वाचा-आरेतील 90 एकरवरील 27 हजार घरांचा एसआरए प्रकल्प बारगळला!