वर्धा - वर्ध्यातील आर्वी विभागांतर्गत खरांगणा सबस्टेशमधील २५ गावांचा विद्युत पुरवठा मध्यरात्री खंडीत झाला. तब्बल १२ तासांनंतर हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरण कंपनीच्या कर्मचऱ्यांना यश आले.
३३ केव्ही तारेवर वीज कोसळल्याने ११ इन्सुलेटर फुटले आणि रात्री येथील विद्युत पुरवठा खंडीतझाला होता. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. रात्रीच वीज वितरणकडून पिंपळखुटा शिवारात दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
खरांगणा वीज वितरण सबस्टेशन अंतर्गत २५ गावांचा समावेश आहे. यात आर्वीकडून येणारे ३३ केव्ही विद्युत तारेवर वीज पडल्याची घतना घडली. यामुळे विद्युत वाहक करणारे ११ इन्सुलेटर फुटले. यामुळे खरांगणा लगतच्या जवळपास २५ गावातील लोकांना रात्र अंधारात काढावी लागली. आर्वीकडून येणारा विद्युत प्रवाह बंद झाल्यास दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने विद्युत प्रवाह रात्रभर बंद राहिला.
सकाळी पुन्हा नादुरुस्त इन्सुलेटर शोधून ते बदलण्याचे काम जलदगतीने वीज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले. आज दुपारी खंडित वीज पुरवठा सुरळीत सुरू झाली. हे काम उपकार्यकारी अभियंता ई. व्ही. हुमने यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता खरांगणा येथील साहय्यक अभियंता चैतन्य देशपांडे यांनी दिली.
मध्यरात्री पासूनच तांत्रिक बिघाड नेमका कुठल्या खांबावर असल्याचे शोध कार्य सुरू झाले. जवळपास २२ ते २५ कर्मचारी रात्रीपासून कामाला लागले होते. पण, अंधार असल्याने अडचणींमुळे आज पहाटेपासून मनीष भागवत, रवींद्र तुमडाम, राकेश मेश्राम यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी काम करत विद्युत पुरवठा सुरळीत केला.