मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, विविध ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्यात. खरं तर निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी प्रामुख्याने शिक्षकांवर असते. त्या काळात शिक्षकच मतदान केंद्रांवर मतदार यादी तपासणे, मतदाराच्या बोटाला शाही लावणे आणि इतर कामे पाहत असतात. आता सध्या या शिक्षकांचे ट्रेनिंग सुरू असून, 20 तारखेला हे सर्व शिक्षक आपापल्या केंद्रांवर कर्तव्य बजावणार आहेत. मोठ्या प्रमाणात शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची विनंती राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना केलीय.
मतदानाच्या दिवशी शाळा बंद : अनेक ठिकाणी मतदान केंद्र हे शाळांमध्येच असतात. त्यामुळे मतदानाच्या दिवशी शाळा बंद ठेवल्या जातात. कारण तिकडे मतदान प्रक्रिया पार पडत असते. अशातच ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षक निवडणुकीच्या कामात असल्याने 18 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर असे तीन दिवस या शिक्षकांचे प्रचंड धावपळीत जाणार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांची कमतरता जाणवू शकते. यावर उपाय म्हणून 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांनी सुट्टी घ्यावी, अशी विनंती राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा प्रशासनाला निवेदनाद्वारे केलीय. खरं तर हे तीन दिवस सुट्टी घ्यायची की नाही याचा सर्वस्वी निर्णय मात्र मुख्याध्यापकांनी घ्यायचा आहे.
प्रशासनाला शाळा ताब्यात घ्याव्या लागणार : विधानसभा निवडणुकांचे बुधवारी मतदान होणार आहे, मात्र त्याआधीच निवडणुकीसाठी प्रशासनाला शाळा ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. याबाबतच्या नियोजनाचा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केलाय. या प्रस्तावावर निर्णय घेत राज्याच्या शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी शाळांना तीन दिवस सुट्टी देण्याबाबतचे परिपत्रक जारी केलंय. आता सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय मुख्याध्यापकांनी स्थानिक पातळीवर घ्यायचा आहे.
हेही वाचा -