वर्धा- मधमाशांनी चावा घेतल्याने हिंगणघाट येथील आंबेडकर शाळेतील २० ते २५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. एका अज्ञाताने शाळे लगत असलेल्या झाडावरच्या मधपोळ्यावर दगड मारला होता. त्यामुळे चवताळलेल्या मधमाशांनी शाळेतील विद्यार्थ्यांना लक्ष केले. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचा हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आंबेडकर शाळेतील विद्यार्थी मैदानात खेळत होते. दरम्यान शाळेलागत एक झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळावर एका अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याचे बोलले जात आहे. दगड मारल्यामुळे पोळ्यावरील मधमाशांनी काही वेळातच शाळेतील विद्यार्थ्यांना लक्ष केले. त्यामुळे शाळेत सर्वत्र धावपळ निर्माण झाली. शाळा परिसरात पसरलेल्या मधमाशांनी विद्यार्थ्यांना चावा घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंगावर खाज आणि वेदना होऊ लागल्या. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तत्काळ उपजिल्हा रुगणालायत दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात नेताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या शरिरावर टोचलेले मधमाशांचे काटे ताबडतोब काढून त्यांच्यावर उपचार केला. यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. मात्र, यातील चार गंभीर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती ठेवण्यात आले.
समस्येकडे पालिकेने केले होते दुर्लक्ष
आंबेडकर शाळेच्या शेजारी एका मोठ्या झाडावर अनेक दिवसांपासून मधमाशांचे पोळे होते. या मधमाशांच्या पोळ्यापासून मोठा धोका होण्याची संभावना होती. याबाबत शाळेतील शिक्षकांना समजताच त्यांनी उपाय योजना करण्याचे ठरवले. त्याअनुषंगाने मधमाशांच्या पोळ्याला झाडापासून वेगळे करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून नगरपालिका आणि वन विभाग प्रशासनाकडे अनेक अर्ज देण्यात आले. मात्र, पालिका प्रशासनाने अर्जाला केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले. परिणामी, मधमाशांच्या हल्ल्यात विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा- 'चोर के दाढी मे तिनका', अखेर खऱ्या पोलिसांनी 'त्या' तोतया पोलिसाला काढले शोधून