वर्धा - हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला नागपूरला हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरोपीला नागपूरच्या कारागृहात हलवण्यात आले.
आरोपीला दुसऱ्या कारागृहात स्थानांतरित करण्याची कारागृह प्रशासनाची मागणी होती. त्यासाठी हिंगणघाटचे नायब तहसीलदार विजय पवार यांच्या समक्ष कारागृहात 5 साक्षीदारांची ओळख परेड करण्यात आली. त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात स्थलांतरित करण्याची संमत्ती वर्धा कारागृह अधीक्षक सुहास पवार यांनी दिली.
आरोपीला मंगळवारी पीडितेच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. यावेळी समाजात त्याच्याप्रती असलेला आक्रोशही त्याला सांगण्यात आला. सर्व ऐकताच माझामुळे हा त्रास होत आहे. मला गोळ्या घालून मारून टाका, असे आरोपी म्हणाला. मात्र, हे शब्द पश्चातापाचे नाही, तर आक्रोशाच्या भीतीमुळे होते. घडलेल्या कृत्याचा कुठेही पश्चाताप त्याला नसल्याचेही चर्चा रंगल्या होत्या
.