वर्धा - जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी)ला प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली.
हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ठिकठिकाणी मोर्चे काढून तिला न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली. हिंगणघाट आणि वर्ध्यामध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची दखल घेत तिच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईवरून डॉक्टर बोलावले होते. सोमवारपासून तिच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज पहाटे साडेचारच्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.