वर्धा- मागील वर्षी समाधानकारक पीक आल्याने यावर्षी जिल्ह्यात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढले होते. शेतकऱ्यांना देखील चांगल्या उत्पन्नाची आशा होती. मात्र, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिवळी पडली आहे. परिणामी सोयबीन पिकाला नुकसान झाले आहे.
आर्वी तालुक्यातील माठोडा बेनोडा गावातील रहिवासी दर्शनकुमार चांभारे हे पेशाने प्राध्यापक आहेत. शेतकरी कुटुंबातील दर्शनकुमार यांनी जवळून शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान बघितले आहे. दुबार पेरणीवर झालेला खर्च, पावसाचा खंड आणि अवकाळी पाऊस यामुळे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व घटनाक्रम कवितेतून मांडण्याच प्रयत्न देखील केला. अनेक फवारण्या करूनही पीक जगले नसल्याची नाराजी त्यांनी कवितेतून व्यक केली.
चांभारे यांच्याप्रमाणे सुशिक्षित व अॅग्रिकल्चरमध्ये पदवीका मिळवलेले जगदीश अडसने यांनी नोकरी सोडून शेती केली. भरघोस पीक मिळून मोठा उत्पन्न मिळेल व त्यातून आपला उदरनिर्वाह होईल, अशी त्यांना आशा होती. मात्र, त्यांच्या देखील आशेचा चुराडा झाला. अडसने यांनी स्वत:चे शेत आणि दुसऱ्याचे शेत बटईने घेऊन जवळपास ४० एकरावर पीक लागवड केली होती. त्यावर निंदण, खूरपण, फवारणी केली. मात्र, पोळ्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस बरेच दिवस चालला. या काळात पिकाला सूर्य उर्जा न मिळाल्याने पिकाची अन्न निर्मिती प्रक्रिया खोळंबली. जमिनीतील पोषक अन्न द्रव्येही पिकांना मिळाली नाही. अशातच खोडकिडीने देखील पिकावर ताव मारला. यात पिकांचे नुकसान झाले.
सोयाबीन हे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांची त्यावर आशा होती. मात्र, आसमानी संकटामुळे ते नष्ट झाले आहे. त्यामुळे, यंदाची दिवाळी ही निराशेतच जाण्याचे चित्र आहे. या नुकसानीचे दुरूनच सर्वेक्षण न करता प्रत्यक्ष बांधावर येऊन सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
हेही वाचा- वर्ध्यात कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद; मुख्य बाजारपेठ बंद, मात्र काही भागात दुकाने सुरू