वर्धा - हिंगणघाट परिसरातील निशानपुरा वार्डात चार वर्षांचा बालकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून असद खान रमजान खान पठाण असे मृताचे नाव आहे.
हिंगणघाट परिसरातील निशानपुरा वार्डात चार वर्षांचा बालकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. हिंगणघाटमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील निशानपुरा वॉर्डमधील जुन्या कांजी परिसरातील झोपडपट्टीलगत नाला आहे. अतिवृष्टीमुळे नाल्याच्या पाण्यात भर पडल्याने पाण्याचा वेग वाढला होता. सायंकाळी पाऊस येण्यापूर्वी मृत बालकाची आई रिजवाना तिच्या घराजवळून काही अंतरावर असलेल्या आईच्या घरी गेली. पाऊस थांबल्यानंतर त्या माघारी जाण्यासाठी निघाल्या. यावेळी असद देखील त्यांच्या मागे निघाला. घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहत असल्याने रिजवानने मुलाला माघारी आईच्या घरी जाण्याचे सांगितले. मात्र मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले. पाण्याचा निचरा होण्यासाठी तुटून पडलेल्या भिंतीच्या विटा काढत असताना अचानक असद वाहून गेल्याचे दिसले.
वाहताना असद एका ठिकाणी अडकला. हे पाहून त्याच्या आज्जीने आरडा ओरड केली. यानंतर शेजारच्या एका व्यक्तीने नाल्यात अडकलेल्या असदला बाहेर काढले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.