वर्धा - पुलगाव मार्गावरील निमगाव शिवारात असलेल्या ढाब्याला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची शक्यता आहे. या आगीचा धूर दूरवरून दिसत असल्याने मोठी आग लागल्याच्या अंदाज व्यक्त होत आहे. आगीच्या ठिकाणी खाद्यतेल आणि डिझेल असल्याने आग मोठ्या प्रमाणात लागल्याचे बोलले जात आहे.
निमगाव शिवारातील ढाब्यावर 11 वाजता लागलेल्या आगीने खळबळ उडाली. यावेळी काही लोक हे झोपलेले होते. वेळीच एकाला आग लागल्याचे समजल्याने त्याने आरडाओरडा केला. यामुळे इतर लोक बाहेर पडले. सुरुवातीला त्यांनी फ्रीज आणि कॉट यासारखे साहित्य बाहेर काढले. एका खोलीत असलेले खाद्यतेल आणि डिझेलचा मोठा भडका उडाला. यावेळी या खोलीतील इतर साहित्य जळून खाक झाले.
कामगारांनी साहित्य बाहेर काढून उपलब्ध असलेल्या पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. हा ढाबा नागपूर येथील गोविंद सोनोने यांच्या मालकीचा असून काही लोक हा ढाबा चालवत असल्याचे सांगितले. यामध्ये काही प्रमाणात साहित्य जळाले असले तरी कुठलीही जीवितहानी झाली नाही.