वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील निंभा येथील एसबीआय बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकावर स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बँकेत शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. या दरम्यान बँक व्यवस्थापक बाहेर जिल्ह्यातून परतले. तसेच होम क्वारंटाइन न होता थेट नागपूरला निघून गेले. ही बाब जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी स्वतः भेट दिल्यानंतर समोर आली. यामुळे शाखा व्यवस्थांपकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप हंगाम सुरू असताना पीक कर्जाची प्रक्रिया थंडावली आहे. मोठ्या प्रमाणात प्रकरणं प्रलंबित असताना समुद्रपूर तालुक्यातील निंभा शाखेचे बँक व्यवस्थापक बॅंकेत थांबत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला. याबाबत अनेक तक्रारी आमदार समीर कुणावार यांच्याकडे देखील आल्या. याच दरम्यान बँक व्यवस्थापक एक दिवस नागपूरातील बँकेत आले. याची माहिती तहसीलदार राजू रणवीर यांना मिळाली. त्यांनी बँक व्यवस्थापकास स्वतःची तपासणी करून त्यांना क्वारांटाइन होण्याच्या सुचना दिल्या. मात्र ते परस्पर निघून गेले.
हेही वाचा... अधिकाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची सरकारवर वेळ - जयंत पाटील
आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करत सत्य परिस्थिती पाहण्यासाठी निंभा येथील एसबीआयच्या बँक शाखेला भेट देण्याची मागणी केली. यावेळी ते गैरहजर असल्याचे समजले. तसेच आदेशाचे पालन न करता निघून गेल्याचे स्पष्ट झाले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून बँकेत अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना अडचण होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाखेला भेट देऊन तहसीलदार राजू रणवीर यांना शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यात.
आता समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण निकाली काढण्यासाठी बँक संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.