वर्धा - गिरड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रासा शिवारातील गोठ्याला मंगळवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत तोंडावर असलेल्या खरीप हंगामासाठी आणलेले खत जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शॉर्ट सर्किटमधून निघालेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते.
मंगळवारी शेतकरी अंकुश जूनघरे हे घरी झोपून असताना अचानक गोठ्याला आग लागली. यात खरीप हंगामासाठी आणलेल्या रासायनिक खताच्या ६० पिशव्या जळून खाक झाल्या. यासोबतच शेती उपयोगी ओलिताचे दीडशे पाईप, दोन पाण्याच्या मोटारी, वखर, नांगर, दतारी या साहित्याची आगीत राखरांगोळी झाली.
यामुळे खरिपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या आगीच्या ठिणगीने २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी अंकुश जुनघरे करत आहेत.