वर्धा : जिल्ह्यातील आष्टी वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धाडी गावात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी वामन मडावी यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकिस आली आहे. धाडी येथील ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी वामन उकंडराव मडावी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल आहे. वामन उकंडराव मडावी शेतात सकाळी गेले असता ते रात्र होवूनही परतले नसल्याने मृतकाच्या मुलाने आधी स्वतः आणि त्यांनतर गावातील इतरांना घेवून शोधाशोध केली. तेव्हा २४ तासांनी चक्क शेतकरी वामन मडावी यांचा मृतदेह धाडी वनबीट क्र.३९ मध्ये छन्नविछंन अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. या बाबत धाडी येथील पोलीस पाटील युवराज चोरे यांनी संबंधित वनविभाग, पोलीस स्थानकांना या बाबत माहिती दिली. मृतक शेतकरी वामन मडावी यांचे पश्चात पत्नी ललिता (४५) जीवन (२८) आशिष (२६) अशी २ मुले आहेत.
प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी : आष्टी वनविभागाकडून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे काम सुरू आहे. आष्टी वन राखीव अखत्यारीत येणाऱ्या परिसरात जंगली वाघाच्या भीतीने नागरिकांना नेहमीच जीव मुठीक घेऊन काम करावे लागते. त्यामुळे अनेक शेतकरी बिबट्या तसेच वाघाल्या हल्यात बळी ठरतात. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
हल्ले रोखण्यात वनविभाग अपयशी : वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. हा परिसर पूर्णपणे जंगलाने व्यापलेला असल्याने वन्य प्राण्यांची येथे नेहमीच वर्दळ असते. साहजिकच या भागातील शेतीही वनक्षेत्राला लागून असल्याने अनेकवेळा वन्यप्राण्यांचा वावर शेतकऱ्यांना दिसत असतो. मात्र, कधी-कधी ही घटनाही जीवावर बेतत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.
शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी देण्याची मागणी : मृतक अल्पभूधारक शेतकरी वामन मडावी यांच्या दोन पैकी एका मुलास वनविभागात नोकरी, २० लाख रुपयाची मदत वनविभागाने करावी अशी मागणी करण्यात येत आहे. सरपंच दिलीप भाकरे सामाजिक कार्यकर्ते रंजीत कुंभरे, शिक्षक वाल्मीक कोडापे, दिनेश लांडे, ज्ञानेश्वर पापडकर, संजय कडू (पाटील) यांनी शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी देण्याची मागणी केली आहे.
नरभक्षक वाघ असण्याची शक्यता : गेल्या सप्टेंबर २२ मध्ये येनाडा (पिलापूर) आणि धाडी येथील वाघाच्या हल्ल्यातील साम्य दिसत आहे. यावरून तो येनाडा परिसरातील नरभक्षक वाघ असण्याची शक्यता असून त्याचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे मत माजी उपसरपंच ईश्वर गाडगे यांनी व्यक्त केले आहे. या वाघाला न पकडल्यास आणखी एखाद्या शेतऱ्याचा बळी जाण्याची शक्याता त्यांनी वर्तवली आहे.