वर्धा - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या कोरोना बधितांचा आकडा हा तीन हजार पार झाला आहे. ही संख्या वाढत असल्याने पुढील काळात अपेक्षित गरज लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे. या परिस्थितीत ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून साधरण पाच हजार रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजनसाठा जिल्हा पातळीवर उपलब्ध करण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 200 च्या घरात जाऊन पोहोचली आहे. यामध्ये 1 हजार 550 रुग्णांवर उपचार सुरू आहे. ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यात जिल्ह्यातील दोन मोठ्या रुग्णालयांसह दोन उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि आरोग्य केंद्र पाहता सर्व ठिकाणी जम्बो आणि लहान सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील व्यवस्था काय?
वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, सेवाग्राम रुग्णालय या ठिकाणसाठी 7 क्युबिक लिटर क्षमतेची 563 जम्बो सिलिंडर उपलब्ध आहे. यासह छोटे 618 सिलिंडरसुद्धा उपलब्ध आहेत. हे सिलिंडर रिक्त होताच नागपुरातील बुट्टीबोरी येथून ते भरून आणले जातात. साधारण 24 तासांत हे सिलिंडर भरून मिळतात.
याशिवाय सावंगी रुग्णालयात 9 हजार किलो लिटरची ट्रायो लिक्विड टँकची स्वतंत्र व्यवस्था आहे. यामुळे दोन मोठे रुग्णालय पाहता एकूण 5 हजार रुग्णांना पुरेल इतका साठ्याचे आजच्या घडीला नियोजन असल्याचे डॉ. अनुपम हिवलेकर यांनी सांगितले.
रुग्ण संख्या पाहता भविष्यातील नियोजन आणि गरज -
जिल्हा सामान्य रुग्णालयांच्या वतीने भविष्यातील रुग्ण संख्या वाढल्यास ऑक्सिजन सिलिंडर आणि त्याची गरज वाढणार आहे. यामुळे नियोजन म्हणून ड्युरा सिलिंडरची मागणी करण्यात आली आहे. सामान्य रुग्णालयात 6 हजार किलो लिटरची साठवण क्षमता असणाऱ्या स्वतंत्र नवीन ऑक्सिजन टँकच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर कळवले आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. शिवाय वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य त्या उपाययोजनाही केल्या जात असल्याचेही सांगितले जात आहे.