वर्धा - सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटसंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ते वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी केलेली ही मागणी कदाचित त्यांच्या आजोबांना आवडली नसेल. यावरही आपल्याला काही बोलायचे नाही, असे फडणवीस म्हणाले.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास प्रक्रिया सीबीआयकडे सोपवावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले. याविषयी फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी यावर काही भाष्य करण्यास नकार दिला.
'पार्थ पवार यांनी काय ट्विट याबद्दल मला केले माहीत नाही. त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली हे खरे आहे. पण सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी, हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यांनी केलेली ही मागणी कदाचित त्यांचा आजोबांना आवडली नसेल. यावर मला काही भाष्य करायचे नाही. पण सीबीआय चौकशी लागली आहे,' असे माजी मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आज वर्धा दौऱ्यावर असताना त्यांनी सावंगी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.