वर्धा - जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावे आणि एकरी ३० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, यासाठी शेतकरी संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे सोयाबीन खरेदी केंद्रे त्वरीत सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची देखील मागणी करण्यात आली.
वर्धा जिल्ह्यात मोठया प्रमाणात सोयाबीन, उडीद तसेच मूग पिकाची कापणी व काढणी सुरू आहे. त्यामुळे नवीन शेतीमाल बाजारात येत आहे. शासनाने सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंंटल ३ हजार ७१० रुपये जाहीर केला आहे. बाजार समिती आवारात किंवा खासगी बाजारात सरासरी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भावाने सोयाबीनची खरेदी सुरू आहे. ही शेतकऱ्यांची लूट आहे. त्यामुळे शासनाने तालुकास्तरावर सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे. तसेच पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन एकरी 30 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. शासनाने मागण्या मान्य केल्या नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.