वर्धा - वर्ध्यातील तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर-अमरावती महामार्गावर पेट्रोलिंग सुरू होती. दरम्यान १२ गोवंश जनावरांना कत्तलखाण्याकडे एका वाहनातून नेण्यात येत होते. पोलिसांनी पाठलाग केला असता चिस्तूर भागातील अफजलपूर शिवारात आरोपी वाहन सोडून फरार झाले. यामुळे कोंबून नेत असलेल्या ६ गाई आणि ६ कारवडची सुटका झाली.
याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत शोध सुरू केला आहे. मालवाहू वाहनातून गायींना कोंबून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे संशयित गाडीचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान अंधाराचा फायदा घेत आरोपी राष्ट्रीय महामार्ग सोडून चिस्तूर भागातील अफजळफूर शिवारात वाहन सोडून पसार झाले.
पहाटे सरपंच देवानंद शेळके यांनी यासंबंधी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेच मालवाहू वाहन असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये १२ जनावर हे कोंबून ठेवल्याचे आढळून आले. भुकेने व्याकुळ असलेल्या जनावरांना जखमा होत्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार करण्यात आला. तसेच स्थानिकांच्या माध्यमातून चारा पाणी करण्यात आला.
पोलिसांनी वाहन चालकांवर (वाहन क्रमांक -MH-३२, AA-१२३२ ) प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यात आल्यासंबंधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाहनांच्या माध्यमातून पुढील तपास सुरू केल्याची माहिती ठाणेदार रवी राठोड यांनी दिली आहे.