वर्धा - भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ यांची जीभ घसरली. हिंगणघाट जळीतकांडावरुन दोघींनी एकमेकांना लक्ष्य केले आहे.
चित्रा वाघ या हिंगणघाट प्रकरणाचा वापर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी करत आहेत. त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका रुपाली चाकणकर यांनी केली होती. त्याला उत्तर देताना वाघ यांनी चाकणकर यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला.
हेही वाचा - महिलांवरील अत्याचाराविरोधात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कायदा लागू करू"
'कसला केविलवाणा प्रयत्न? एक महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला आहे.ती 72 तासांपासून मृत्यूशी झुंज देत आहे. एक महिला म्हणून मी या प्रकरणावर बोलत आहे. पीडितेला मंगळवारी सायंकाळपर्यंत सरकारकडून कुठलीच मदत मिळाली नव्हती. सरकारची ऐपत नसेल तर भाजप तिच्या उपचाराचा खर्च उचलण्यास तयार आहे, असे मी म्हटले यात काय चुकीचे आहे?' असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.
दोन दिवसांपासून सरकार मदत देण्याची घोषणा करत होते. मी मुलीच्या कुटुंबियांना भेटले तोपर्यंत त्यांना मदत मिळाली नव्हती. खोटारडेपणा करायला सरकारला लाज नाही वाटत का, असेही वाघ म्हणाल्या.