वर्धा - भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर असलेल्या गलवान खोरे येथे दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. त्यामुळे वर्ध्यात भूमिपुत्र संघर्ष वहिनीच्या आणि माजी सैनिक संघटनेच्यावतीने शहरातील शिवाजी चौकात चीनचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. तसेच हल्यात हुतात्मा झालेल्या 20 जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटपट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले. चीनच्या या भ्याड हल्यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. तर अनेक जवान बेपत्ता आहेत.
हेही वाचा... चिनी वस्तुंच्या मालाची होळी करुन 'आप'ने वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली
चीनचा हा स्वभावच आहे. घात करणाऱ्या चीनला जशाच तसे उत्तर द्यायला पाहिजे. केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलले पाहिजे, असे मत माजी सैनिक संघटनेचे माजी सैनिक श्याम परसोडकर, प्रवीण पेठे यांनी व्यक्त केले.
चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे. चीनच्या वस्तू खरेदी करून आपण त्यांनाच सक्षम करतो आहे. याच पैशाचा वापर करत चीन सैन्य आणि हत्यार घेऊन सक्षम होत आहे. याच पैशाच्या वापरातून आपल्यावर हल्ला करत आहे, असेही श्याम परसोडकर आणि प्रवीण पेठे यावेळी म्हणाले.
यावेळी चीनच्या ध्वजाचे फलक लावलेला प्रतिकात्मक पुतळा जाळून चीनचा निषेध करण्यात आला. तसेच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली. चिनी ड्रॅगन मुरदाबादचे नारे लगावण्यात आले. तसे चीनच्या या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भूमीपुत्र संघर्ष वाहिनीचे जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, प्रविण पेठे, श्याम परसोडकर, स्वपनील किटे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.