वर्धा- इंदिरा गांधींची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन असल्याने आजचा दिवस काँग्रेस आणि पुरोगामी विचारांसाठी महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. महात्मा गांधींनी न्याय मागण्यांसाठी सत्याग्रहचा मार्ग दाखवला होता. त्याच मार्गाने आम्ही जात आहे. आम्ही सर्वधर्म संभावाची प्रार्थना करत या भूमीचा आशीर्वाद घेत सत्याग्रह करत आहोत. केंद्रसरकार मूठभर लोकांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचे काम कायद्याच्या माध्यमातून करत आहे, अशी टीका मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
सेवाग्राम येथे राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी थोरात यांनी ही टीका केली. सेवाग्राम येथे काँग्रेसचे मान्यवर मंडळी यांनी बापू कुटीत बसून मौन ठेवत दर्शन घेतले. आश्रमात आतमध्ये सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर आश्रम परिसराच्या बाहेर सामाजिक अंतर ठेवत सत्याग्रह करण्यात आले. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या फोटोचे पूजन करत यावेळी मौन पाळून भजन कीर्तन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
कायदा रद्द करण्यासाठी गांधीजींच्या मार्गाने सत्याग्रह चालू आहे
केंद्राचे कायदे हे शेतकरी विरोधी असून ते साठेबाज आणि नफेखोरांच्या बाजूचे आहे. आज बहुजनांच्या, गरीब माणसाच्या हितासाठी हे आंदोलन आहे. केंद्र सरकार काही मूठभर लोकांसाठी शेतकऱ्यांचे शोषण करण्याचे काम या कायद्याच्या माध्यमातून करत आहे. हे कायदे रद्द होण्यासाठी आम्ही सत्याग्रह करत आहोत, असे थोरात म्हणाले.
कायद्याविरोधात आघाडी सरकार सोबत आहे
आघाडी सरकार केंद्राच्या विरोधात आहे. लवकरच यात मंत्री मंडळाची उपसमिती स्थापन होणार आहे. या कायद्यातील चुकीच्या गोष्टी, विशेष म्हणजे बाजार समितीची व्यवस्था ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात बाजार समित्या अस्तित्वात आल्या. याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या माल विक्रीची व्यवस्था करण्यात आली. आज सगळे खुले करून बाजार समित्या मोडीत निघणार आहेत. केंद्राच्या कायद्यामुळे ही व्यवस्था मोडीत निघणार आहे. या कायद्यामध्ये शेतकऱ्याला पैशाची हमी दिली जात नाही. हमीभावबद्दल स्पष्ट निर्देश नाहीत. जिथे कुठे शेतकऱ्यांवर अन्याय होईल, तिथे दुरुस्ती करण्याचे अधिकार सुद्धा या कायद्यात नाही, अशी माहिती थोरात यांनी दिली.
बाहेर राज्यातून व्यपारी येईल, आमचा उपविभागीय अधिकारी काय करणार
कायद्यात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागता येईल, असे सांगण्यात आले आहे. पण, सर्वांना माहीत आहे की उपविभागीय अधिकारी हे किती दाद देऊ शकतात. सोबतच बिहार, उत्तर प्रदेशचे व्यापारी येतील आणि माल खरेदी करून जातील, पण आमचा उपविभागीय अधिकारी काय करणार? असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला. या सगळ्या त्रुटी ठेवून साठेबाजीचा अधिकार देऊन स्वस्त दरात शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला जाणार आहे. तोच माल साठेबाजी करून महागात जनतेला विकला जाणार आहे. ही व्यवस्था साठेबाजांकरिता असल्याचे पक्के मत असून याचा आम्ही विरोध करत आहोत, असे थोरात म्हणाले.
वाटले असते तर गर्दी केली असती, पण....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संख्या कमी असावी, गर्दी होऊ नये, सामाजिक अंतर पाळावे, ते पाळत आहोत. आम्ही आवाहन केले तर वर्धा गर्दीने भरून गेले असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे असाल तिथे सत्याग्रह करण्याचे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे शासनाचे नियम पाळण्याचेही काम आम्ही करत आहोत, असे महसूल मंत्री म्हणाले. यावेळी सत्याग्रह आंदोलनात काँग्रेसचे प्रभारी एच.के पाटील, काँग्रेसचे सचिव आशिष दुवा, संपत कुमार, व्ही संदीप, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलताराव टोकस, आमदार रंणजित कांबळे, माजी आमदार अमर काळे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.
हेही वाचा- शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन, कृषी कायद्याला विरोध