वर्धा - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्ती निमित्त भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने नागरिकांमध्ये जाऊन संदेश पोहोचवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. वर्ध्यातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्ती निमित्त अभियानाची माहिती देण्यात आली. भाजप दुसऱ्यांदा सत्तेत आले. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कामाची पावती म्हणून पुन्हा सत्तेत आले. या दुसऱ्या टप्प्यातील वर्षभरात अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.
राम मंदिर निर्माण, तीन तलाख, नागरिकत्व संशोधन कायदा करण्याचे धाडसी निर्णय घेतले. याचीच माहिती देण्यासाठी व्यक्तिगत संपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचे खासदार तडस म्हणाले. वर्धा लोकसभा मतदारसंघात 6 लाख पत्रक वाटणार असून, त्यापैकी 3 लाख हे वर्धा जिल्ह्यात वाटले जाणार आहेत. तसेच 16 व्हर्च्युअल सभा सुद्धा घेणार असल्याचे खासदार तडस यांनी सांगितले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी बूथ प्रमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सुद्धा नागरिकांना भेटून प्रत्यक्ष संवाद साधून मोदी सरकारच्या कामाची माहिती पोहोचवणार असल्याची माहिती दिली. यासह विदर्भाला मोठा फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्याला भरभरून निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्याला राष्ट्रीय महामार्गाशी जोडून विकासाचे नवे मार्ग खुले केले असल्याचे गोडे म्हणाले.
आमदार रामदास आंबटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती देताना, व्यक्तिगत संपर्कावर भर राहणार असल्याचे सांगितले. सोबत डिजिटल संपर्क, व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मोठा प्रमाणात लाखो नागरिकांपर्यंत पोहोचता येणार आहे. नवीन माध्यमातून घरात राहूनच लोक जोडले जात असल्याचे त्यांनी संगीतले. या नवीन माध्यमातून मोठा युवक वर्ग जोडला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे, खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदर डॉ. रामदास आंबटकर, आमदार डॉ. पंकज भोयर, माजी खासादर विजय मुडे, सुरेश वाघमारे, अभियांचे संयोजन संघटन मंत्री तथा अभियानाचे संयोजक अविनाश देव यांची उपस्थिती होती.