वर्धा - जिल्ह्यातील सेवाग्राम मेडिकल कॉलेज समोरच्या मत्स्यपालन तलावात दोघा बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली. शेळ्या चारण्यासाठी गेलेले बहीण-भाऊ परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता, तलावाच्या काठावर चप्पल आणि सायकल आढळून आली. यावेळी तलावात मृतदेह आढळून येताच गावात शोककळा पसरली. अविनाश गोंडागे (व.१३) आणि अनुष्का राजेंद्र गोडांगे (व.१२) असे मृत बहीण भावाचे नाव आहे.
दोघेही लगतच्या वस्तीत राहणारे असून रोज बकऱ्या चराईसाठी परिसरात जात होते. आज नियमित वेळेवर परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर शोधला असता, ते कोठेच आढळून आले नाहीत. मात्र, एका ठिकाणी घडलेल्या घटनेत सायकल आणि चप्पल आढळून आली. यावेळी संशय आल्याने तलावात शोध घेतला असता, अनुष्काचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर अविनाशचा (१३) देखील मृतदेह मिळाला. यावेळी सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे यांच्यासह पोलीस कर्मचारी हजर होते. दोघाही बहीण-भावाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास सेवाग्राम पोलीस करत आहे.
हेही वाचा- इकडून तिकडे जाणाऱ्याला जनता माफ करत नाही- रणजित कांबळे