वर्धा - जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठीही आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सज्ज आहे. यासाठी येथे ३० खाटांचा विशेष वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. सध्या सावंगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे २४ रुग्ण भरती असून आतापर्यंत १२ शस्त्रक्रियाही यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू तथा ज्येष्ठ मुखशल्यचिकित्सक डॉ. राजीव बोरले यांनी ही माहिती दिली.
कोरोनाबाधित रुग्णांनी मातीचा किंवा धुळीचा संपर्क टाळवा -
हा आजार शरीरात विविध मार्गाने प्रवेश करीत असला तरी प्रामुख्याने श्वसनमार्गाने या आजाराच्या विषाणूंचा संसर्ग वाढतो आहे. साधारणतः नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक आणि डोळ्यांना कमकुवत करणारा आहे. यामुळे कोरोनाबाधित मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे नितांत गरजेचे आहे. मातीचा किंवा धुळीचा संपर्कही रुग्णांनी टाळला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यास ठरते घातक -
म्युकरमायकोसिस हा प्राणघातक बुरशीजन्य आजार ब्लॅक फंगल इन्फेक्शन म्हणूनही पूर्वीपासून वैद्यकीय क्षेत्राला परिचित आहे. मधुमेही, हृदयरुग्ण, कर्करोगग्रस्त, मूत्रपिंडविकार असलेले किंवा एचआयव्हीबाधित रुग्णांना कमीअधिक प्रमाणात बाधक ठरणारा हा दुर्मिळ आजार आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी नव्याने त्रासदायक ठरला आहे. विशेषतः रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरलेल्या या आजाराने कोरोना काळातील आरोग्य सेवेपुढेही एक नवे आव्हान उभे केले आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची फळी उपचारासाठी सज्ज -
म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी नव्याने स्वतंत्र वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. यात मॅक्सिलोफेशिअल सर्जन, नाक, कान व घसारोगतज्ज्ञ तसेच नेत्र शल्यचिकित्सक, न्यूरॉलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, एंडोक्रिनोलॉजिस्ट अशी तज्ज्ञांची फळी येथे कार्यरत आहे. रुग्णांचा आजार नियंत्रित करण्यासाठी उपलब्ध औषधोपचार आणि गरज भासल्यास शस्त्रक्रिया सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजारावरील औषधोपचार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत केला जात असल्याने रुग्णांना ही दिलासा देणारी बाब आहे, असे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी सांगितले.
आजार जुनाच, पण आता तीव्रता वाढली -
म्युकरमायकोसिस हा जुनाच आजार असून सावंगीच्या शरद पवार दंत रुग्णालयातील आमच्या ओरल अँड मॅक्सिलोफेशिअल सर्जरी विभागात आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. भारतात १ लाख लोकसंख्येमागे १४ रुग्ण असे या आजाराचे प्रमाण आहे. गत सहा महिन्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या वर्षभरात म्युकरमायकोसिसचे शंभराहून अधिक रुग्ण सावंगी रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतले आहेत. या पूर्वीही म्हणजे कोरोनासंसर्ग पसरण्यापूर्वी अकोला, अमरावती आणि मध्यभारतातील अन्य गावांतून आलेल्या रुग्णांनी इथे उपचार घेतले आहेत, अशी माहिती ओरल व मॅक्सिलोफेशिअल सर्जरी विभाग प्रमुख डॉ. नितीन भोला यांनी दिली.
हेही वाचा - खराब व्हेंटिलेटर देणाऱ्या कंपन्यांवर सरकारने गुन्हे दाखल करावेत - जलील