वर्धा - हिंगणघाटमध्ये शिक्षक तरुणीला जिवंत जाळल्याच्या प्रकारानंतर विविध स्तरांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध म्हणून हिंगणघाट वकील संघाने आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील पुरविला आहे. आज न्यायालयात हजर केले असता आरोपीला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांचा रोष पाहता पोलिसांनी आज आरोपीला न्यायालयात गुप्तरित्या हजर केले. हिंगणघाट येथील सहदिवाणी न्यायाधीश रत्नमाला डफरे यांनी या आरोपीला पोलीस कोठडीत पाठवले. याप्रकरणी सरकारतर्फे एस. डी. गावंडे यांनी बाजू मांडली.
हेही वाचा - हिंगणघाट 'छपाक': 'जो जैसा कर रहा हैं उसको वैसी ही सजा मिलनी चाहिए'
'नैतिक जबाबदारी समजून कुणीही आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, असे आम्ही ठरविले आहे. अशा घटना देशात पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाकडून तत्परतेने कार्य अपेक्षित आहे', असे मत हिंगणघाट वकील संघाचे अध्यक्ष अॅड ए. एस. काकडे यांनी मांडले.