वर्धा - बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने रविवारी पक्ष्यांचा अधिवास स्वच्छ करून जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. यावेळी वर्ध्या जवळच्या मदन तलाव परिसरात बहारच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये कचऱ्यासह प्लास्टिक गोळा करून तो नष्ट केला. या परिसरात येणाऱ्या लोकांमुळे पक्ष्यांच्या प्रजातील धोका निर्माण होऊ नये. यासाठी स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छ आणि सुरक्षित अधिवास मिळवून देण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले.
हेही वाचा - पारधी बेड्यावर स्वच्छता मोहीम, नागपूरच्या व्हिएनआयटीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
पक्षी हे निसर्ग आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पण आज माणसाच्या चुकीच्या सवयींचा परिणाम पक्ष्यांना भोगावा लागत आहे. यामुळे पाणथळ दिनानिमित्त मदन तलाव परिसरातील विखुरलेले जाळे, प्लास्टिक गोळा करण्यात आला. कचरा ट्रॅक्टरमध्ये जमा करत नष्ट करण्यात आला. या माध्यमातून पक्ष्यांना अधिवास उपलब्ध करून देण्यात आला. मासेमारी करणाऱ्या बांधवांना माहिती देत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा - वर्ध्यात तळघरामध्ये दारूनिर्मिती, पोलिसांनी ३ हजार लीटर सडवा केला नष्ट
पाणथळ दिनाची सुरवात....
1971 साली इराणमधील रामसर या शहरी 'पाणथळ प्रदेशांचे महत्त्व' या विषयावर एक परिषदेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पाणथळ प्रदेशाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, हाच उद्देश ठेवून परिषद घेण्यात आली. तेव्हापासूनच 2 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक पाणथळ भूमी दिवस' अर्थात 'वर्ल्ड वेटलँड डे, म्हणून साजरा केला जातो. पाणथळ प्रदेश हा पाणपक्ष्यांचा अधिवास आहे. पण या अधिवासाची सद्यस्थिती चिंताजनक आहे. येणाऱ्या पर्यटकांकडून प्लास्टिकसारखा कचरा टाकला जातो. यासह मासेमारांकडून खराब झालेले जाळे त्याच परिसरात फेकून दिले जातात. याचा फटका मात्र पक्षी आणि वन्यजीवांना बसतो. त्यामुळे आजच्या या जागतिक पाणथळ दिनानिमित्त बहार नेचर फाऊंडेशन तर्फे मदन तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
बहार नेचर फाउंडेशनच्या अभ्यासकांनी मदन तलाव परिसरात स्वच्छतेसह पक्षी निरीक्षण देखील केले. यामध्ये बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष, किशोर वानखडे, वन्यजीव मानद संजय इंगळे तिगावकर, दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, वैभव देशमुख, दीपक गुढेकर, राहुल वकारे, अविनाश भोळे, राजू भुरे उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता येथील अॅडव्हेंचर कॅम्प साईटच्या संचालक भारती गोमासे, प्रतीक आणि आतिश यांचे सहकार्य लाभले.