वर्धा : बुधवार (दि.1 फेब्रुवारी)रोजी सायंकाळी (6.30) वाजता मुख्य सभामंडपात सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे खंजिरी भजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमापासून खऱ्या अर्थाने संमेलनास सुरुवात होईल. संमेलनात राज्य व राज्याबाहेरुन येणाऱ्या साहित्य रसिकांसाठी ग्रंथदालन प्रमुख आकर्षण असते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभानंतर या दालनांचे उद्घाटन होऊन ती खुली केली जातात. वर्धा येथील संमेलनात मात्र वेगळेपण जपत आणि ग्रंथ दालने वाचकांना पूर्णवेळ उपलब्ध व्हावे यासाठी (दि. 2 फेब्रुवारी)रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे : संमेलनस्थळी पुस्तकांच्या प्रकाशनांसाठी 60 बाय 80 फुटाचा स्वतंत्र मंडप तयार करण्यात आला आहे. या मंडपास ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंच असे नाव देण्यात आले असून, या मंचाचे उद्घाटन देखील (दि. 2 फेब्रुवारी)रोजी ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर होईल. ग्रंथप्रदर्शन व प्रकाशन मंचाचे उद्घाटन मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्याहस्ते होणार आहे. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता सामुदायिक प्रार्थना व खंजिरी भजन देखील होणार आहे. सामुदायिक प्रार्थना प्रकाश महाराज वाघ व भजन भाऊसाहेब थुटे हे सादर करतील. या सर्व कार्यक्रमांचा साहित्य रसिक व वर्धाकर नागरिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मान्यवरांचे स्वागत : संमेलनातील ग्रंथ दिंडी हा एक महत्वाचा उपक्रम असतो. ग्रंथ दिंडीची मार्ग, सहभागी झांकी, विद्यार्थी, लेझीम पथक, बॅंड पथक, भजन पथक, पारंपारिक वेषभूषेतील विद्यार्थी, सद्या संमेलन परिसरात उभारण्यात येत असलेले मंडप तसेच भोजन, निवास, मान्यवर साहित्यिकांची व्यवस्था, वाहतूक, सांस्कृतिक कार्यक्रम, शहर सुशोभिकरण, सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्था व वैद्यकीय मदत, प्रतिनिधी नोंदणी, पाणी पुरवठा, सजावट आदी विविध समित्यांचा त्या-त्या समितीच्या प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला आहे. संमेलनासाठी राज्यासह राज्याबाहेरून देखील हजारो साहित्य रसिक येणार आहेत. या मान्यवरांचे स्वागत व त्यांच्या मदतीसाठी वर्धा व सेवाग्राम येथील रेल्वे स्थानक, बसस्थानक येथे स्वागत व चौकशी कक्ष राहणार आहे.
सत्यपाल महाराजांच्या खंजरी भाजनाने कार्यक्रमांची सुरूवात : मर्यादीत निवास व्यवस्थेमुळे काही साहित्य रसिक नागपुर येथून ये जा करण्याची शक्यता आहे. या रसिकांना ये जा करण्यासाठी परिवहन विभागाच्या सहकार्याने वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ठराविक दरात ही वाहने आणणे आणि सोडून देण्याचे काम करतील. साहित्य रसिकांना बसस्थानक व रेल्वे स्टेशनवरून संमेलनस्थळी येण्यासाठी निश्चित दरात ॲटोसेवा सुध्दा उपलब्ध राहणार आहे. दरम्यान, यंदा साहित्य संमेलनाला सुरुवात होण्याच्या अगोदर दोन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथे सत्यपाल महाराजांच्या खंजरी भाजनाने कार्यक्रमांची सुरूवात होणार आहे.
हेही वाचा : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीचं ठरलं लग्न.. कोण आहे होणारी नवरी? म्हणाले, 'लवकरच..'