वर्धा- दहेगाव गोसावी हे गाव तुळजापूर स्टेशनच्या रेल्वेरुळांमुळे दोन भागात विभागले गेले आहे. गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी असलेले रेल्वे गेटही तीन वर्षांपूर्वी बंद करण्यात आले. या ठिकाणी पादचारी पूल बांधावा, यासाठी मागील अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले.
गावकऱ्यांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद केल्यानंतर पर्यायी पूल किंवा भुयारी मार्गाची सोय करायला पाहिजे होती. मात्र, प्रत्यक्षात असे झाले नाही. मागील अनेक वर्षांपासूनच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक तात्पुरता बोगदा बांधून देण्यात आला. त्याचे अंतर पादचाऱ्यांना लांब पडत असल्याने लोकांनी रेल्वेरूळ ओलांडून ये-जा करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत या जीवघेण्या प्रवासाचे 100 पेक्षा जास्त बळी गेले. म्हणून पादचारी पूल बांधून देण्याची वारंवार मागणी केली जात होती.
हेही वाचा - विधान परिषदेत विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न'
चार दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गावात बैठक घेऊन काही मागण्या मान्य केल्या. मात्र, पादचारी पुलाला निधी कोण देणार, हा प्रश्न न सुटल्याने मंगळवारी पुन्हा आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी रेलरोको करू नये, यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. नागरिकांनी रेल्वे रुळाजवळ जाण्याच्या प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी आमदार समीर कुणावर आणि खासदार रामदास तडस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
रेल्वेचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. या पुलासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा झाली असून जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) फंडातून 60 लाख देण्यात येईल. याशिवाय उर्वरित रक्कम सुद्धा लवकरात लवकर दिली जाईल, असेही बगळे यांनी सांगितले. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात सरपंच संदीप वाणी, रामकिशोर सिंगणधूपे, अरुण उरकांदे, अजय धंदरे, विजय भोमले, सुरेश धंदरे, उमेश राऊत, सचिन महाबुधे, योगेश खाडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला.