वर्धा - खरांगणा पोलीस ठाण्यातून आरोपींना न्यायालयात नेत असताना पोलीस वाहनाला अपघात झाला. वाहनाच्या स्टेरिंगमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. या अपघातात वाहन चालक आणि आरोपीसह काही जण किरकोळ जखमी झाले.
आर्वी तालुक्यातील खरांगणा पोलीस ठाण्यातील आरोपींना आर्वी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात न्यावे लागते. पाच आरोपींना घेऊन पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड हे आर्वीच्या दिशेने जात होते. वाढोणा परिसरात अचानक वाहनाचे स्टेरिंग फिरणे बंद झाले. त्यामुळे वाहनाचा अपघात झाला. राजू थोटे आणि राहुल चौकोन या जखमी कर्मचाऱ्यांना सेवाग्राम येथे वैदकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
हेही वाचा - हिंदूच गायींचे ठेकेदार आहेत, तेच गाय कापायला पाठवतात - सरसंघचालक मोहन भागवत
जखमी आरोपी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जखमींना प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, अशी माहिती आर्वीचे ठाणेदार संपत चव्हाण यांनी दिली.