वर्धा- सेलू तालुक्यातील दहेगाव पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाबाधित असताना मृत्यू झाला आहे. आज सकाळी त्रास होत असल्याने त्यांचा सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस कर्मचाऱ्याची २७ ऑगस्टला अँटिजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना ३१ ऑगस्टला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यानंतर त्यांना हिंदी विद्यापीठाच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. मात्र, आज सकाळी त्रास होत असल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा हृदय संबंधी कारणाने मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कोरोनामुळे शवविच्छेदन होणार नसल्याने त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र कळू शकणार नाही.
जिल्ह्यातील सध्याची कोरोना परिस्थिती..
जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता १७ पोलीस कर्मचारी, ४ अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची बाधा झाली आहे. असे एकूण २१ पोलीस कर्मचारी बाधित आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पोलीस अधीक्षक यांच्या चालकालासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. जिल्ह्याच्या कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ८७ झाला आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात एकूण २५ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ३३० जणांवर उपचार सुरू आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पत्नीला कोरोनाची लागण
वर्धा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. काळजी घेऊनसुद्धा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि त्यांचे कुटुंबीय यांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी ते सध्या गृह विलगीकरणात आहे.
लक्षणे नसल्याने काळजी घेण्याची गरज
सध्या लक्षणे नसणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एकीकडे रोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक क्षमता तयार होत असली, तरी धोका टळला, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे, काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सामाजिक अंतर राखणे आणि मास्क लावणे, तसेच स्वच्छ हात धुण्याचे आवाहन केले जात आहे.
हेही वाचा- मुंबईत पहाटे तीन वाजेपर्यंत 28 हजार 293 गणेश मूर्तींचे विसर्जन