वर्धा - आर्वी येथील कदम रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात ( Illegal Abortion Racket ) नवनवीन खुलाचे होत आहेत. पोलिसांनी काल शनिवारी कदम यांच्या घराची झडती ( Police raided in Kadam House ) घेतली. दुपारी 1 वाजतापासून रात्री 11 वाजतापर्यंत चाललेल्या कारवाईत तब्बल 97 लाख 42 हजाराची रोकड पोलिसांच्या हाती लागली आहे. आर्वी पोलीस ही रोकड कोषागार विभागाला देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिली आहे.
9 ते 10 तास चालली कारवाई -
अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाच्या खुलाशानंतर संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे आरोग्य विभागातील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यंत्रणा हादरून गेल्याने चौकशी समिती अभ्यास गट पाहणी करत आहे. सोबतच आर्वी पोलिसही प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करत असल्याने नवीन खुलासे होत आहे. शनिवारी पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी पथकासोबत सुरू केलेल्या मोहीमेत जवळपास 9 ते 10 तास चाललेल्या कारवाईत 97 लाख 42 हजाराची रोकड जप्त केली आहे. यात हिशोब सादर करू न शकल्याने ही रोकड एका पेटीत जप्त करून सील करण्यात आली आहे. ही रोकड शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार असल्याचेही पोलीस विभागकडून सांगण्यात आले आहे. पुढे याचा तपास आयकर विभाग यासंदर्भात हिशेबाची तपासणी करतील.
आयकर विभाग करणार हस्तक्षेप -
या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पत्नी रेखा कदम, डॉ. नीरज कदम यांच्या अटकेनंतर घराची झाडाझडती घेण्यात आली. पण त्यावेळी रुग्णालयाच्या वर असलेल्या घरातील अलमारीच्या चाव्या देण्यात आल्या नाही. त्यामुळे पोलिसांनी अलमारीला सीलबंद करून ठेवले होते. त्यात चाव्या मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास सुरू झालेली कारवाई उशिरा रात्री 11 वाजताच्या सुमारास संपली. यामध्ये रोकड शोधण्यासह रोकड मोजण्यासाठी बराच वेळ गेला. त्यानंतर ही सर्व रक्कम एका लोखंडी पेटीत ठेवून ती पेटी सील करण्यात आली आहे. यात पोलीस, आरोग्य, कातडीमुळे वनविभाग आणि आता आयकर विभागाला सुद्धा या प्रकरणात तपास करावा लागणार आहे.