वर्धा - आष्टी तालुक्यातील जोलवाडी शिवारात अप्पर वर्धा प्रकल्पाच्या कालव्याच्या खड्ड्यात आज २२ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी साकाळी पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शीतल अशोक तायवाडे असे मृत युवतीचे नाव आहे.
सोमवारी ती युवती सकाळी कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, घरी परतली नसल्याने शोधाशोध सुरू झाली. रात्री आष्टी पोलिसात तक्रार देण्यात आली. पण शोधून कुठेही पत्ता लागला नाही. अखेर आज सकाळी काहींना पाण्यात तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांना माहिती मिळताच वर्धा प्रकल्पाच्या कालव्यातील खड्ड्यात आढळेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. ती शीतल तायवाडे असल्याने उघडकीस आले. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. परिसरातील नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी श्वविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत तिने आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे.
आष्टी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास आष्टी पोलिसांनी सुरू केला आहे. आत्महत्या करण्याचे कारण तपासात पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.